भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सारोळा येथील नीरा नदीवरील पुलावरून नदीत उडी मारून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून शिरवळ पोलीस तपास करीत आहेत.प्रतीक्षा अनिल शिर्के (वय २०, रा. भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, प्रतीक्षा ही शिरवळ येथील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत दुसऱ्या वर्षात शिकत होती. सोमवारी दुपारी पेपर दिल्यावर सायंकाळी ६ वाजता ती साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या सारोळा येथील नवीन पुलावर आली. मध्यभागी उभी राहून पुलावरुन नीरा नदीत उडी मारली. पाण्यात मोठा आवाज झाल्यामुळे येथील नागरिक व मच्छीमारी करणाऱ्या लोकांनी तातडीने शिरवळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, हवालदार दत्तात्रय धायगुडे, रत्नसिंह सोनवलकर घटनास्थळी दाखल झाले.(वार्ताहर)>तीन तासांनंतर मृतदेह सापडलानीरा नदीला असलेला पाण्याचा प्रवाह आणि अंधारामुळे मृतदेह शोधकार्यात अडचण येत होती. अखेर तीन तासांच्या शोधकार्यानंतर रात्री साडेनऊला मृतदेह सापडला. शोधकार्यात शिरवळ पोलीस व स्थानिक नागरिकांनी मदत केली. सारोळा येथील नवीन पुलावरून प्रतीक्षाने आत्महत्या केली त्या ठिकाणी पुलावर सॅकमध्ये पुस्तके, महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि सँडेल आढळून आले. या ओळखपत्रावरून आत्महत्या केलेली तरुणी प्रतीक्षाच असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला; तो खरा ठरला.
नदीत उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: April 05, 2017 1:14 AM