नवी मुंबई : चेन्नईच्या मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेता न आल्यामुळे नैराश्यात विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. जुईनगर येथील राहत्या घरात बेडरुममध्ये गळफास लावून तिने सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली.श्रध्दा जाधव (१८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ७ जुलै रोजी ती घरातून निघून गेली होती. याप्रकरणी ती हरवल्याची तक्रार देखील नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र दुसºया दिवशी ती आजोबांकडे गेली असल्याचे समजल्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली होती. परंतु तिकडून आल्यानंतर देखील ती निराश होती. तिला चेन्नई येथील मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश हवा होता. परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तसेच वडील निवृत्त असल्याने तिच्या प्रवेशासाठी अडीच लाख भरण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली होती. या कारणातून तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले.सोमवारी संध्याकाळी आई भाजी खरेदीसाठी तर वडील मोबाइलच्या दुकानात गेले होते. यादरम्यान काही वेळासाठी तिची दोन लहान भावंडे देखील घराबाहेर गेली असता, तिने एकांतामध्ये बेडशीट पंख्याला बांधून आत्महत्या केल्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून पुणे येथील मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान, तिच्या कुटुंबात देखील अज्ञात कारणावरून वाद सुरू असायचे, असेही समजते. याच कौटुंबिक वादाच्या कारणातून देखील ती नैराश्यात होती अशीही परिसरात चर्चा आहे.
नेरळमध्ये विद्यार्थिनीची नैराश्यातून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 5:33 AM