- संजय पाटील अमळनेर (जळगाव): गेल्या वर्षी २२ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद झाल्या. त्यामुळे शासनाला आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा जणू विसरच पडला आहे. कोरोनामुळे राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील सुमारे साडेचार लाख विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून पोषण आहारापासून वंचित आहेत. राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थी आपापल्या घरी वस्त्या, वाड्या, पाड्यांवर निघून गेले. त्या वेळी १६ मार्च २०२० पूर्वी आश्रमशाळांना मिळालेले गहू, तांदूळ, धान्य, कपडे हे स्थानिक आदिवासी कुटुंब, आर्थिक दुर्बल कुटुंब, रेशन कार्ड नसलेले कुटुंब, अपंग, निराधार कुटुंब, विधवा महिलांचे कुटुंब, आपत्तीग्रस्त कुटुंब यांना वाटप करण्याचे आदेश शासनाने दिल्याने मुख्याध्यापकांनी ते साहित्य इतरत्र वाटून दिले.राज्यात ५५६ शासकीय आश्रमशाळा असून, सुमारे दोन लाख विद्यार्थी आहेत. अनुदानित आश्रमशाळा ५५० असून, त्यात अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही सर्व आदिवासी मुले पोषण आहारापासून वंचित आहेत.शासनस्तरावर मुलांना पोषण आहार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापपर्यंत पोषण आहाराबाबत कुठलेही निर्देश नाहीत - विनीता सोनवणे, प्रकल्प अधिकारी
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी आहारापासून वंचित; साडेचार लाख विद्यार्थी वर्षभरापासून दुर्लक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 7:48 AM