अहमदनगर : जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की ‘छडी लागे छम छम..’ असा आजपर्यंतचा सर्वसाधारण समज आहे. मात्र, आधुनिक युगात अहमदनगर जिल्ह्यातील जि. प. शाळांचे रूपडे पालटत असून आयएसओ मानांकनासह शाळा डिजिटल होताना दिसत आहेत. याचेच पुढचे पाऊ ल म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेतील ४० ते ५० विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) येथे काढण्यात येणार आहे. विज्ञानाविषयीचे कुतूहल आणि शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गुरुवारच्या बैठकीत मंजुरी देत १० लाख रुपयांची तरतूद केली. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश शास्त्राची माहिती व्हावी. त्यांच्यात गुणवत्ता असल्यास त्यांना शास्त्रज्ञ होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी तीव्र इच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी व्यक्त केली होती. या विषयाबाबत बिनवडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यास तत्काळ संमती दिली. त्यानंतर मूळ प्रयोगाची तयारी पूर्ण करण्यात आली. यासाठी शासन पातळीवर असणाऱ्या आवश्यक सर्व मंजुरी घेण्यात आल्या. देशात ग्रामीण भागात राबवण्यात येणाऱ्या पहिल्या प्रयोगात प्रत्येक तालुक्यातून आवश्यक ज्ञानासंदर्भात प्रकल्प विद्यार्थ्यांकडून तयार करून घेण्यात येणार आहेत. हे प्रकल्प शास्त्रज्ञांकडून प्रमाणित करण्यात येतील. यातून प्रत्येक तालुक्यातील ३ विद्यार्थ्यांचा गट तयार करण्यात येईल. यात किमान एक विद्यार्थिनी असेल. जिल्ह्यातून अशा प्रकारे तयार होणाऱ्या ४० ते ५० विद्यार्थ्यांना विमानाने इस्रोत पाठवण्यात येईल. कृतियुक्त वैज्ञानिक सहल या उपक्रमातून ही सहल पाठवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची सहल इस्रोत जाणार!
By admin | Published: November 18, 2016 7:42 AM