नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सोमवार १९ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या परीक्षांसाठी प्रवेशपत्र ‘आॅनलाइन’ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत, परंतु अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रच ‘डाऊनलोड’ होत नसल्याने, महाविद्यालयांचे कर्मचारी हैराण झाले आहेत. परीक्षेला अवघे तीन दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासाठी पायपीट करावी लागत आहे.नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसाठी परीक्षा विभागाने ‘एमकेसीएल’सोबत जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘एमकेसीएल’तर्फे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘आॅनलाइन’ प्रवेशपत्र ‘अपलोड’देखील करण्यात आले. महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’मधून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होणार होते, परंतु काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रेच नसल्याचे दिसून आले. त्यानंतर महाविद्यालयांनी तातडीने परीक्षा विभागात धाव घेतली व तांत्रिक कारणांमुळे ही ओळखपत्रे दिसत नसल्याचे स्पष्ट झाले. अनेक विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात चुकीचे विषय किंवा चुकीची माहिती नमूद असल्याची तक्रारदेखील महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. अवघे तीन ते चार दिवस शिल्लक असताना, हा प्रश्न समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत विद्यार्थीदेखील दररोज परीक्षा भवनात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘आॅनलाइन’ प्रवेशपत्रांची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
By admin | Published: October 17, 2015 3:05 AM