पुणे : मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षाच द्यावी लागणार आहे. त्यामुळे केवळ सीईटी परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच परीक्षा घेण्याची घाई केल्यामुळेच राज्यातील विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे, असे मत आता तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.गेल्या काही दिवसांपासून मेडिकलसाठी नीट की राज्याची सीईटी परीक्षा घेणार, याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. न्यायालयाने यावर अंतिम निर्णय देत राज्याच्या सीईटीतून मेडिकलचे प्रवेश देण्यास मनाई केली. तसेच येत्या २४ जुलै रोजीच्या नीट परीक्षेला राज्यातील विद्यार्थ्यांना द्यावीच लागेल असे स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मेडिकल प्रवेशप्रक्रियेबाबत न्यायालयात निकाल प्रलंबित असताना राज्य शासनाने मेडिकलसह सर्व अभ्यासक्रमासाठी एकच सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यातही केवळ बारावीच्या गुणांच्या आधारे निगेटिव्ह मार्किंग न ठेवता सीईटी परीक्षा घेतली जाईल, असे स्पष्ट केले. परिणामी विद्यार्थ्यांनी केवळ बारावीचाच अभ्यास केला. अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम सीईटीसाठी बंधनकारक केला असता तर विद्यार्थ्यांची तयारी झाली असती. सीईटी परीक्षांचे मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, ‘‘राज्यातील विद्यार्थ्यांना १ मे रोजी नीट परीक्षा दिली आहे. तसेच ज्यांनी दिली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजीची नीट परीक्षा देता येईल. परंतु, त्यातील केवळ एकाच परीक्षेचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा न्यायालयाकडून संवेदनशीलपणे विचार केला जाईल, असे वाटले होते. मात्र, आता राज्यातील विद्यार्थ्यांना नीटसाठी दोन वर्षांचा अभ्यास दोन महिन्यात करावा लागणार आहे. राज्यातील २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ५०० विद्यार्थ्यांनीच नीट परीक्षेची तयारी केली असेल. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.’’
राज्यातील विद्यार्थ्यांचे ‘नीट’मुळे होणार नुकसान
By admin | Published: May 10, 2016 1:17 AM