ठाणे : आॅनलाईन प्रक्रिया झाल्यानंतर शासनाने ज्या कॉलेजना मान्यता दिली होती, ती महाविद्यालये प्रवेश यादीत नव्हती. मात्र चौथ्या लिस्टनंतरही जे प्रवेशापासून वंचित आहेत अशांसाठी प्रवेशप्रक्रियेची दुसरी फेरी होणार का आणि झाली तर त्यात ठाण्यातील नव्या ज्युनिअर कॉलेजचाही समावेश होऊन जागा वाढणार का, याबद्दल साशंकता आहे.अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १७ जूनला संपली. मात्र १७ जूनलाच शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार ठाणे-मुंबईतील काही शैक्षणिक संस्थांच्या कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता मिळाली. त्यात ठाणे शहरातील नऊ तर जिल्ह्यातील ५७ कॉलेजचा समावेश आहे. यात ठाण्यातील पाच, मुंब्य्रातील तीन तर कळव्यातील एक कॉलेज आहे. त्यांना कनिष्ठ महाविद्यालयासाठी परवानगी मिळाली आहे. परंतु ही महाविद्यालये पहिल्या आॅनलाइन प्रक्रियेत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा पर्यायच उपलब्ध नव्हता. दुसरीकडे अद्याप विविध कारणांमुळे जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्यांच्या प्रवेशाबाबत काय निर्णय होतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले असून जर त्यांच्यासाठी पुन्हा प्रवेशप्रक्रिया झाली. तर त्या प्रक्रियेत या नवीन महाविद्यालयांचा पर्याय विद्यार्थ्यांना खुला होणार का हाही प्रश्नच आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या महाविद्यालयांमध्ये ठाण्यातील ५, कळव्यातील १ तर मुंब्रा - कौसा येथील ३ महाविद्यालयांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना मिळणार नवीन कॉलेजचा पर्याय?
By admin | Published: July 22, 2016 2:32 AM