पुणे : इयत्ता बारावीची मूळ गुणपत्रिका शुक्रवारी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रियाही शुक्रवारपासून सुरू केली जाणार आहे. बहुतेक महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन होणार आहे.स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ म्हणाले, की कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेचे प्रथम वर्ष प्रवेश शुक्रवारपासूनच सुरू होतील. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज करावेत. आलेल्या अर्जातून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून प्रवेश दिले जातील.मॉडर्न महाविद्यालयाचे प्रवेशही शुक्रवारपासूनच सुरू होणार आहेत. प्रथम वर्ष प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता अर्ज भरावेत. त्यानंतर गुणवत्ता यादी आणि प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया होणार आहे, असे प्राचार्य आर. एस. झुंजारराव यांनी सांगितले. फर्ग्युसन महाविद्यालयातील कला, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील प्रवेशाचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून अर्ज करता येतील. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यू. एन. उमराणी म्हणाले, की विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर दि. ३ ते ११ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. इतर महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रियाही शुक्रवारपासून सुरू होईल. (प्रतिनिधी)
बारावीची मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना आज मिळणार
By admin | Published: June 03, 2016 12:50 AM