पुणे : रोबोट, वेगात धावणारी रेसिंग कार अशा विविध प्रकारच्या शोधात आघाडी घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी चक्क उपग्रह तयार केला आहे. हा उपग्रह येत्या बुधवारी इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपणतळावरून इतर २० उपग्रहांसोबत झेपावणार आहे. येथील कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी ही डोळे दीपवणारी कामगिरी केली आहे. त्यांनी या उपग्रहाला ‘स्वयम्’ असे नाव दिले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेला भारतीय बनावटीचा हा पहिलाच लघू उपग्रह आहे. तसेच भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कमी वजनाचा उपग्रह म्हणूनही ‘स्वयम्’चे वेगळेपण आहे. साधारणपणे एक वर्ष हा उपग्रह कार्यरत राहील. प्रक्षेपण झाल्यानंतर ४५ मिनिटांनी अॅन्टिना निश्चित जागेवर येईल. त्यानंतर उपग्रह व सीओईपीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागेल. मागील वर्षीच इस्रोने या उपग्रहाच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब केले होते. या लघू उपग्रहाच्या निर्मितीसाठी ५० लाखांचा खर्च झाला आहे. या लघू उपग्रहाचे वजन ९९० ग्रॅम असून त्याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी साधारण १० सेंटीमीटर एवढी आहे. सहा सोलर पॅनेलच्या मदतीने उपग्रह कार्यरत राहणार आहे. २० उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवणारयेत्या बुधवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘पीएसएलव्हीसी-३४’ हा प्रक्षेपक ‘स्वयम्’सह एकूण २० उपग्रह घेऊन अवकाशात झेपावेल. यामध्ये १८ उपग्रह हे विदेशी आहेत, तर तामिळनाडू येथील सत्यभामा विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तयार केलेल्या एका उपग्रहाचाही यामध्ये समावेश आहे. शिवाय पुण्याच्या विद्यार्थ्यांचा ‘स्वयम्’ही असणार आहे. 2008 पासून विद्यार्थ्यांनी ‘स्वयम्’साठी प्रयत्न सुरू केले होते. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने तब्बल १७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हे मिशन पूर्णत्वास नेले. दरवर्षी या मिशनमध्ये काही नवीन विद्यार्थी आपले योगदान देत होते, अशी माहिती ‘सीओईपी’चे संचालक भारतकुमार अहुजा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी अॅप्लाइड सायन्स विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. एम. वाय. खळदकर, डॉ. संदीप मेश्राम उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी बनविलेला उपग्रह झेपावणार
By admin | Published: June 17, 2016 6:16 AM