अकोला - किडनी तस्करी प्रकरणामधील सूत्रधार शिक्षक शिवाजी कोळी याला घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शुक्रवारी सांगलीला रवाना झाले. हे पथक कोळीच्या घराची झाडाझडती घेणार आहे. किडनी तस्करी प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेला सांगली जिल्हय़ातील शिवाजी कोळी सध्या पोलीस कोठडीत असून, पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोळीला नागपूर आणि यवतमाळमध्ये नेण्यात आले होते. या दोन ठिकाणी काही हॉस्पिटलची तपासणी व डॉक्टरांचे जबाब घेतल्यानंतर कोळीसह शिरसाट व जाधव या तिघांविरुद्ध मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता सखोल तपासासाठी शिवाजी कोळीला घेऊन एक पथक शुक्रवारी सांगली जिल्हय़ात गेले. या ठिकाणावरूनही पीडितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. कोळी हा सांगली जिल्हय़ात असताना त्याने अनेकांना गंडवून अशाच प्रकारे त्यांच्या किडनी काढल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळेच कोळीला घेऊन हे पथक सांगलीत गेले आहे. सांगलीत हे पथक दोन दिवसांचा मुक्काम करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विनोद पवारच्या घराची झडती किडनी तस्करी प्रकरणामधील बुलडाणा जिल्हय़ातील आरोपी विनोद पवार याच्या मांडवा येथील घराची झडती घेण्यासाठी खदान पोलिसांचे एक पथक शुक्रवारी रवाना झाले. या पथकाकडून रात्री उशिरापर्यंंत विनोद पवारच्या घराची झडती सुरू होती. या झडतीमध्ये काही आक्षेपार्ह दस्तऐवज मिळण्याची अपेक्षा पोलीस पथकाला आहे. यासदंर्भात अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी पवारच्या घराची झडती सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
सूत्रधार शिवाजी कोळीला घेऊन पोलीस सांगलीत!
By admin | Published: December 12, 2015 2:49 AM