बारामती : सात ते आठ महिन्यांपासून सुमारे दोन किलोची गाठ पोटात घेऊन ‘ती’ जगत होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने उपचारासाठी पैसे नव्हते. वेळेत उपचार होत नसल्याने तिची प्रकृतीही दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती; मात्र बारामती येथील उपजिल्हा रुग्णालय तिच्यासाठी देवदूतासारखे धावून आले. कोणत्याही खर्चाशिवाय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही दोन तास शस्त्रक्रिया करून तिची त्रासापासून सुटका केली. पुणे येथे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय नंदा जगताप यांना सात महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला त्यांनी किरकोळ उपचार करून पाहिले; मात्र दिवसेंदिवस पोटदुखी वाढू लागली. तसेच, पोटाचा आकारही वाढू लागला. पुणे येथील रुग्णालयातच त्यांनी सोनोग्राफी केली. त्यामधे पोटामध्ये गाठ तयार झाल्याचे निदान झाले. ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला पुणे येथील डॉक्टरांनी दिला; मात्र शस्त्रक्रिया करण्याएवढे पैसे नसल्याने जगताप हतबल झाल्या होत्या. ४० ते ५० हजार रुपये कोठून उभे करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता; मात्र बारामती येथे जगताप यांच्या नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना शेलार यांची भेट घेऊन जगताप यांच्या प्रकृतीची कल्पना दिली; तसेच त्यांचे सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवले. उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. तसेच बारामती येथील डॉ. एम. स्वामी यांनी जगताप यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून सुमारे २.२०० किलोगॅ्रमची गाठ काढण्यात आली. या शस्त्रक्रियेवेळी डॉ. स्वामी यांना डॉ. दर्शना शेलार, डॉ. सुजित अडसूळ, अधिपरिचारिका शीतल गाडे आदींनी सहकार्य केले. कोणत्याही खर्चाशिवाय पार पडलेल्या उपचारांमुळे नंदा जगताप यांना नवजीवन मिळाल्याने त्यांच्या नातेवाइकांनीही समाधान व्यक्त केले.
उपजिल्हा रुग्णालय बनले ‘तिच्या’साठी देवदूत
By admin | Published: February 08, 2017 2:48 AM