मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांच्यासह अन्य महिला सदस्यांना एसएमएसवरून धमकी देण्याचा प्रकार अत्यंत हीन आणि गंभीर असून असे कृत्य करणा-या व्यक्तीचा शोध घेऊन या प्रकरणी राज्य सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली याचा सारांश अहवाल सभागृहात सादर करावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले. त्याचबरोबर अशी मानसिकता का निर्माण होते याचाही राज्य सरकारने अभ्यास करावा, असेही ते यावेळी म्हणाले. नीलम गो-हे यांना एसएमएसवरून एका अज्ञात इसमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. शेकापचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारास धमकीचे एसएमएस येतात, ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी गृहखात्याने काय कारवाई केली याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जयंत पाटील यांच्या या मुद्द्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पाठिंबा दिला. एखादी अज्ञात व्यक्ती आमदाराचा फोन नंबर मिळवून त्यावर धमकीचा एसएमएस करते, एक नंबर ब्लॉक केला तरी दुसरा नंबर मिळवून त्यावर एसएमएस धाडण्याचे धाडस करते, हे गंभीर असल्याचे ते म्हणाले. या धमकी प्रकरणाला आठ ते दहा दिवस उलटून गेले. राज्य सरकार दहा दिवसात काहीच करू शकत नाही, अश टीका मुंडे यांनी केली हे कृत्य कोण करीत आहे ते शोधा व त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्याचबरोबर असे अशा पद्धतीने मेसेज पाठवण्यामागे नेमकी काय मानसिकता आहे, याचाही विचार करून उद्या सभागृहात अहवाल सादर करावा, असे निर्देश सभापतींनी दिले. (प्रतिनिधी)
महिला आमदारांच्या धमकीप्रकरणी अहवाल सादर करा - रामराजे
By admin | Published: March 07, 2017 4:49 AM