श्रीनारायण तिवारी, मुंबईअन्न व औषध प्रशासन विभागातील (एफडीए)अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच खडबडून जागे झालेले एफडीएचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सातही विभागीय संयुक्त आयुक्तांना तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले़ एफडीए राज्यातील मिठाई आणि दुधाच्या किरकोळ विक्रेत्यांची अडवणूक करीत असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर राज्यातील लाखो किरकोळ विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले़ यासंदर्भात डॉ. भापकर म्हणाले की, ‘‘किरकोळ विके्रत्यांना नोटिसा पाठविण्यात आल्याचे व उत्पादकाचे परवाने किरकोळ विके्रत्यांना देण्यात आल्याचे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे समजले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त मी नागपुरात होतो.’’ तेथेच त्यांनी ही मालिका वाचली व प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्यातील सातही संयुक्त आयुक्तांना दिले असून, तीन दिवसांत याबाबतचा चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले असून, संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. ते जास्तीत जास्त प्रकरणात टोलवाटोलवीची उत्तरे देत होते. उदा. एवढ्या मोठ्या संख्येने किरकोळ विक्रेत्यांना उत्पादकाचा परवाना कसा दिला गेला, असा परवाना द्यायच्या आधी जागेची पाहणी का केली नाही, आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा का बघितल्या नाहीत याची उत्तरे न मिळाल्यामुळे प्रकणात ‘गडबड’ असल्याचा संशय त्यांनी बोलून दाखविला़ आपण या मालिकेचे कात्रण संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवले असून, मालिकेत उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मागितल्याचे भापकर म्हणाले़
तीन दिवसांत अहवाल सादर करा !
By admin | Published: December 22, 2014 4:59 AM