Maharashtra Politics: राज्यात अनेकविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकाबाजूला लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून, दुसरीकडे लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच आता निवडणुका झाल्यास भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असा घरचा आहेर देत पक्षातील ज्येष्ठ नेत्याने आता तरी जागे व्हा, असा सल्ला दिला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत महाराष्ट्र भाजपला जागे होण्याचे आवाहन केले आहे. आज निवडणुका झाल्या तर भाजप तोंडघशी पडणार हे निश्चित. महाविकास आघाडी त्यांना अगदी आरामात चितपट करण्याच्या स्थितीत आहे. भाजप नेतृत्वाने झोपेतून जागे व्हावे, असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.
एनडीएची मतदानाची टक्केवारी केवळ ३९.३ टक्के
आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तर एनडीएची मतदानाची टक्केवारी केवळ ३९.३ टक्के राहणार आहे. भाजपला ३३.८ टक्के तर शिवसेना शिंदे गटाला केवळ ४.४ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी झपाट्याने आपला जनाधार वाढवत आहे. स्वामींच्या म्हणण्यानुसार, आज निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला ४७.७ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १९.९ टक्के मते मिळू शकतील, तर राष्ट्रवादीला १५.३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला १२.५ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे, असे म्हटले जात आहे. आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला भाजपपेक्षा ८.४ टक्के जास्त मते मिळण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजपने तातडीने सावध व्हायला हवे, असे स्वामी म्हणतात. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. तिथे भाजपचा एवढा पराभव झाला तर ते भविष्यासाठी चांगले नाही. भाजप नेतृत्वाने झोपेतून जागे होऊन पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असा सल्ला स्वामींनी दिला आहे.