मुंबई : राज्यातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अनुदानाचीच चर्चा दिसत आहे. कारण निवडणुकीच्या प्रचारात विनाअनुदानित तत्त्व शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याचा नारा देत, उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तर प्रत्येक शाळा अनुदानित करण्यासाठी मोठा लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या शाळा व महाविद्यालयांमुळे शिक्षण क्षेत्रात विषमता निर्माण झाल्याचे, शिक्षक परिषदेचे उमेदवार वेणुनाथ कडू यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, ‘प्रचारादरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी शहरांतील विविध शाळांमधील शिक्षकांशी संवाध साधला. त्यात विनाअनुदानित धोरणामुळे गोरगरीब विद्यार्थी व शिक्षकांचे आर्थिक शोषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विनाअनुदानित धोरणाला शिक्षण क्षेत्रातूनच हद्दपार करून, राज्यातील प्रत्येक माध्यमातील शाळा व महाविद्यालये अनुदानावर आणण्यासाठी मोठा लढा उभारण्याचा निर्णय शिक्षक परिषदेने घेतला आहे.’देशात व राज्यात शिक्षण हक्क कायदा सुरू झाला. त्यामुळे हक्काचे शिक्षण मिळाले असले, तरी शिक्षण मोफत मिळत नसल्याची भूमिका शिक्षक परिषदेने मांडली आहे. कोकण विभागात अनेक विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची महाविद्यालये आहेत. मात्र, येथील शिक्षकांना कमी वेतनावर राबवून घेतले जात आहे, तर गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना खासगी शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यातूनच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यासाठी सर्वच शाळा जर अनुदानावर आणल्या, तर हे सारे प्रश्न सुटू शकतील, अशी शिक्षक परिषदेची भूमिका आहे. (प्रतिनिधी)
अनुदानाचा मुद्दा तापला!
By admin | Published: January 30, 2017 3:59 AM