मुंबई : अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय काढणार, अशी कुणकुण लागल्याने शिवसेनेला डावलून लेखानुदान मंजूर करण्यात आले.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा ‘आॅन लेग’ होती. शिवसेनेचे विजय औटी आणि जयप्रकाश मुंदडा यांना त्यावर बोलायचे होते. बोलण्यासाठी त्यांनी हातही वर केले. पण तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी ‘चर्चा संपली’ असे जाहीर करून लगेच २०१७-१८चे लेखानुदानही मंजूर करून घेतले. त्यामुळे संतप्त झालेले विजय औटी यांनी ‘काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आम्हालाही दाबता का,’ असा सवाल केला. त्यावर विभागवार चर्चेत तुम्ही काय बोलायचे ते बोला, असे उत्तर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी औटी यांना दिले.सरकारने दडपशाही सुरू केली आहे, यांना चर्चा नको आहे, त्यामुळे अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चादेखील या सरकारने गुंडाळून टाकली, असा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केला. सरकारने आता शिवेसेनेवरही दडपशाही सुरू केल्याचे ते म्हणाले. १९ आमदारांच्या निलंबनावरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सभागृहात बुधवारपासून बहिष्कार टाकला आहे. गुरुवारीही बहिष्कार कायम होता. मात्र विधानसभेत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा सुरू होती. भाजपाचे राजेंद्र पाटणी त्यावर बोलत होते; पण त्यांना ‘आॅनलेग’ ठेवले गेले. कामकाज संपल्यानंतर भाजपातर्फे कोणालाही बोलायचे नाही, असे सांगण्यात आले आणि सर्वसाधारण चर्चा संपवली गेली. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत कोणत्याही विषयावर बोलता येते, त्यासाठी विभागाचे किंवा विशिष्ट क्रमांकाच्या मागण्यांवर बोलण्याचे बंधन नसते. शिवाय, या चर्चेला अर्थमंत्री उत्तर देत असतात तर विभागवार चर्चेला त्या त्या विभागाचे मंत्री उत्तर देत असतात. त्यामुळे या चर्चेत जर कर्जमाफीचा विषय शिवसेनेने काढला असता तर अर्थमंत्र्यांना त्यावर बोलावे लागले असते. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेला डावलून लेखानुदान मंजूर
By admin | Published: March 23, 2017 11:47 PM