ठाणे : मागील दोन वर्षे उत्पन्नआणि खर्चाच्या कात्रीत सापडलेला पालिकेचा गाडा आता खऱ्या अर्थाने रुळावर आला असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आखलेल्या विविध योजनांमुळे पालिकेचे उत्पन्न हे मागील वर्षीच्या तुलनेत १५३ कोटींनी अधिक वाढले आहे. त्यातही खास बाब म्हणजे महासभेने जे उत्पन्न अपेक्षित धरले होते, त्याची ५० टक्यापर्यंत पालिकेच्या विविध विभागांनी मारली आहे. त्यातही पाणीपुरवठा विभागाने तर चक्क मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ११२.३८ टक्के अधिक वसुली केली आहे. ठाणे महापालिकेत एलबीटी लागू झाल्यानंतर उत्पन्न कमी होऊन अनेक कामे प्रलंबित होती. पालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबरच ठेकेदारांची बिले निघतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आयुक्तांनी उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक विभागाला टार्गेट ठरवून दिल्याने आणि थकबाकीची वसुली कशा पद्धतीने करता येऊ शकते,यासाठी विविध योजना हाती घेतल्याने मागील वर्षी प्रमाणेच यंदादेखील उत्पन्नात वाढ झाली आहे. दरम्यान मागील वर्षी ३१ आॅक्टोबर २०१५ पर्यंत पालिकेचे विविध स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न हे ८१५.९० कोटी एवढे होते. तेच या वर्षी ३१ आॅक्टोबर पर्यंत ९६८.९९ कोटी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५३.०९ कोटी एवढी आहे. विशेष म्हणजे मागील कित्येक वर्षे पिछाडीवर असलेल्या पाणीपुरवठा विभागाने यंदा वसुलीत गरुडझेप घेतली आहे. मागील वर्षी या विभागाने १.३० कोटींची वसुली केली होती. ती यंदा ३१ आॅक्टोबर पर्यंत १४.९८ कोटी एवढी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती १३.६८ कोटी म्हणजेच तब्बल ११२.३८ टक्के अधिक आहे. यंदा प्रथमच ७.३७ कोटी रुपये हे पाणीपुरवठा सेस म्हणून पालिकेला प्राप्त झाले आहेत. तर त्या खोलाखाल समाज विकास विभागानेही १०८.३३ टक्के जास्त प्राप्त केले आहेत. शिक्षण विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १०५.३६ टक्के अधिक उत्पन्न प्राप्त केले आहे. मालमत्ताकर विभागाने यंदा ४५.२३ टक्के अधिक वसुली केली आहे. मागील वर्षी १६०.३० कोटींचे उत्पन्न प्राप्त करणाऱ्या या विभागाने यंदा २०६.२४ कोटींची वसुली केली आहे. परंतु, दुसरीकडे एलबीटी पोटी पालिकेला यंदा केवळ ३१ आॅक्टोबरपर्यंत ३७९.१८ कोटी प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी ३७३.२२ मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ५४.१७ टक्के एवढी अधिक आहे. शहर विकास विभागानेही४८.२९ टक्के अधिक उत्पन्न मिळविले असून, अग्निशमन दलाने पिछाडीवर मात करून आघाडी घेतली आहे. या विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४१.५५ टक्के अधिक मिळविले आहेत. (प्रतिनिधी)मागील वर्षाचे उत्पन्न ८१५ कोटीमागील वर्षी ३१ आॅक्टोबर २०१५ पर्यंत पालिकेचे विविध स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न हे ८१५.९० कोटी एवढे होते. तेच या वर्षी ३१ आॅक्टोबरपर्यंत ९६८.९९ कोटी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५३.०९ कोटी एवढी आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात १५३ कोटींची भरीव वाढ
By admin | Published: November 04, 2016 3:21 AM