लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शहरात १५.८८, पूर्व उपनगरात ६०.८० आणि पश्चिम उपनगरात ५४.७३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. मुंबई व्यतीरिक्त ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पुढील ४८ तासांसाठी पावसाचा मारा कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, शहरासह उपनगरात सरीवर सरी कोसळत असतानाच पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी चौपाटयांवर गर्दी झाल्याचे चित्र होते.मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाचा तडाखा सुरु असतानाच पडझडीच्या घटनाही सुरुच आहेत. शहरात २, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ६ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. घाटकोपर येथील अल्ताफ नगरमध्ये भिंत पडून एक महिला जखमी झाली. जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालय प्रशासनाने महिलेला मृत घोषित केले. मृत महिलेचे नाव मालती नारायण जाधव (४५) आहे. पी.एल. लोखंडे मार्गावरील धम्मदिप चाळ येथील तळमजला अधिक एक असे बांधकाम असलेल्या चाळीचा काही भाग पडला. यात दोन माणसे फसली होती. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. जोगेश्वरी पूर्वेकडील फ्रान्सिस वाडी येथील नाल्यावरील पादचारी पूल पडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही मार लागलेला नाही. कांदिवली येथील खान गल्लीमध्ये एका घरात गॅस लिकेज झाल्याने आग लागली आणि सिलेंडरचा स्फोट झाला. परिणामी आग लागून तीनजण जखमी झाले. जखमींना आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुलाब यादव, राजु यादव आणि आसिफ मोहम्मद अशी जखमींची नावे आहेत.दरम्यान, शहरात ३, पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात २, पूर्व उपनगरात २० आणि पश्चिम उपनगरात ५५ अशा एकूण ७७ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने दुर्घटनांत हानी झाली नाही.
पावसाने केले उपनगर चिंब
By admin | Published: July 03, 2017 4:54 AM