दिगांबर जवादे, गडचिरोलीगृह विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मागील १० वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी १०१ जणांना जागा उपलब्ध करून देत, घर बांधण्यासाठी मदतही करण्यात आली आहे.नक्षलवादी चळवळीमध्ये जाणारे बहुतेक तरुण गरीब आहेत. नक्षलवाद्यांनी दिशाभूल करून त्यांना चळवळीमध्ये सामील करून घेतले. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने २००५पासून नक्षल आत्मसमर्पण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत संबंधित नक्षलवाद्यांवर असलेले सर्व जुने गुन्हे माफ करून त्यांच्या पदाप्रमाणे रोख रक्कमसुद्धा दिली जाते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते, ही बाब लक्षात आल्यानंतर आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढत चालले आहे. आत्मसमर्पण करणारी व्यक्ती पुन्हा आपल्या दुर्गम भागातील गावाकडे गेल्यास त्याच्या जीविताला नक्षलवाद्यांकडून धोका निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता राहते. त्यामुळे योजनेअंतर्गत पैसा मिळाला तरी राहण्याची फार मोठी समस्या निर्माण होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी गडचिरोली शहराच्या जवळपास राहण्याची इच्छा पोलीस विभागाकडे वर्तविल्यानंतर पोलीस विभाग तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून संबंधित व्यक्तींसाठी जागा उपलब्ध करून देते. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १०१ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना घरांचे पट्टे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून शासनाने आपल्याला नवजीवन मिळवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया काही आत्मसमर्पित नक्षल्यांनी बोलूनही दाखविली आहे.
आत्मसमर्पितांना हक्काचा निवारा
By admin | Published: October 19, 2015 2:42 AM