मुंबई : शहरात अनेक ठिकाणी उद्याने विकासाच्या प्रतीक्षेत असताना कुर्ला आणि चुनाभट्टीतील उद्याने फुलली असल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे. शहरातील अन्य विभागांच्या तुलनेने कुर्ला-चुनाभट्टीत उद्यानांची संख्या कमी असली तरीही असलेली उद्याने पालिका प्रशासनाने उत्तम पद्धतीने सांभाळली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक पालिकेच्या कामाबद्दल समाधानी आहेत.कुर्ला आणि चुनाभट्टी येथील उद्याने जोपासण्यात पालिकेला सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश आले आहे. कुर्ला येथील छत्रपती शिवाजी उद्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, एटीआय मैदानांचे पालिकेने उत्तमरीत्या जतन केले आहे. तसेच चुनाभट्टी येथील छत्रपती शिवाजी उद्यान, छत्रपती शिवाजी मैदानाचीसुद्धा पालिकेने चांगली काळजी घेतली आहे. चुनाभट्टीतील मनोरंजन उद्यानाचे विकासकाम सध्या सुरू आहे. सध्या उकाड्याचे दिवस असल्याने परिसरातील उद्यानांमध्ये नागरिकांची गर्दी जमत आहे. तसेच शाळांना सुट्ट्या असल्यामुळे बच्चेकंपनीचीही उद्यानांमध्ये तुफान गर्दी होत आहे. पालिकेने उद्यानांमध्ये विविध प्रकारची खेळणी ठेवली आहेत. त्या खेळण्यांचा बच्चेकंपनी भरपूर आनंद घेताना दिसून येतात. उद्यानांमधील खुल्या व्यायामशाळेत व्यायाम करायला येणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे. पालिकेने बहुतेक सर्वच उद्यानांमध्ये खुल्या व्यायामशाळा उभारल्या आहेत. या व्यायामशाळांना तरुण मुलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्यानांमध्ये, मैदानांमध्ये असलेल्या जॉगिंग ट्रॅकचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. (प्रतिनिधी)
पालिकेच्या प्रयत्नांना ‘हिरवेगार’ यश
By admin | Published: April 28, 2017 2:41 AM