हितेन नाईकपालघर :
पालघर पोलिस विभागाची समुद्रात पेट्रोलिंगसाठी गेलेली ‘अशोका’ बोट दुपारी साडेतीन वाजता समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि तुफानी लाटांमध्ये सापडली. या बुडणाऱ्या बोटीला केळवे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात जाऊन सुखरूप किनाऱ्यावर आणले.
समुद्रात केळवे ते दातिवरे या भागात पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली ‘अशोका’ बोट दातिवरे गावासमोर समुद्रात ७ नॉटिकल भागात गेली. तेव्हा बोटीत हळूहळू पाणी शिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या कापून त्याद्वारे बोटीत शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. स्पीड बोटीतून त्यांचे लाइफ जॅकेटसह अन्य साहित्य वाहून गेले होते. बोटीतील एका अधिकाऱ्याने सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. गायकवाड यांनी कॉन्स्टेबल जयदीप सांबरे, वसंत वळवी, पी. सी. साळुंखे तसेच मच्छीमार हर्षल मेहेर, राकेश मेहर, आतिश मेहेर, रितेश मेहेर, चंद्रकांत तांडेल आणि रुपेश बंगारा यांना साेबत घेत ‘लक्ष्मीप्रसाद’ बोट समुद्रात रवाना झाली. सुटकेचा निःश्वास समुद्रात वादळी वारे आणि लाटा उसळत असताना मच्छिमारांनी तासभर प्रवास करत बोटीचा शोध घेतला. समुद्रात भरती असल्याने बोट भरतीच्या प्रवाहाने दातिवरे गावाकडून टेंभी गावाच्या समोर वाहत आली होती. यावेळी मदतीसाठी पोलिसांची आणखी एक बोट आल्यानंतर ‘अशोका’ बोटीतील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सर्वांच्या मदतीने बोटीतील पाणी बाहेर काढण्यात यश मिळाले.