एमआयटी पुणेचे संशोधन : गारांऐवजी पडणार पाऊस, यवतमाळसह २१ केंद्रांची शिफारस रूपेश उत्तरवार - यवतमाळ गारपिटीमुळे दरवर्षी कोट्यवधींचे होणारे नुकसान टाळण्यात तंत्रज्ञानाला यश आले आहे. पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) संशोधकांनी गाररोधक यंत्रणा तीन वर्षाच्या संशोधनाअंती विकसित केली आहे. डॉप्लर रडारच्या सहायाने गारांचे ढग ओळखून त्यावर सिलव्हर क्लोराईड आणि सोडियम क्लोराईडची फवारणी केली जाणार आहे. यामुळे गारांऐवजी पाऊस कोसळणार आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा संशोधन प्रकल्प भारतीय कृषी अनुसंधान केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. संपूर्ण देशात दरवर्षी गारपिटीने प्रचंड नुकसान होते. महाराष्ट्रात त्यातही विदर्भात दरवर्षी रबी हंगामात गारपिटीने नुकसान होते. शासनाच्या अहवालानुसार गत दहा वर्षात कोट्यवधीचे नुकसान गारपिटीने झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईही द्यावी लागते. मात्र आता या संशोधनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे येथील एमआयटीच्या संशोधकांनी तीन वर्ष सतत संशोधन करून गाररोधक यंत्राचा शोध लावला आहे. विकसित केलेल्या डॉप्लर रडारच्या सहाय्याने गारा असलेले ढग ओळखले जाणार आहे. त्याचे स्थान निश्चित केले जाईल. संबंधित ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवून गारांच्या ढगांमध्ये रॉकेटमधून सिलव्हर क्लोराईड आणि सोडीयम क्लोराईडची फवारणी केली जाणार आहे. यासाठी देशात २१ केंद्र उभारण्याची शिफारस करण्यात आली असून राज्यात नगर जिल्ह्यातील संगमनेर, पुणे जिल्ह्यातील मालवण आणि विदर्भातील एकमेव यवतमाळ येथे केंद्राची शिफारस करण्यात आली आहे. एका केंद्रावरून ५०० किलोमीटर परिसरातील गार क्षेत्र नियंत्रित करता येणार आहे. एका केंद्राच्या उभारणीसाठी ४२ कोटी रुपये लागणार आहे. तर वर्षभरासाठी या केंद्राचा खर्च सहा कोटी ९० लाख रुपये येणार आहे. मात्र गारपिटीच्या नुकसानीचा आकडा पाहता ही रक्कम अत्यंत कमी आहे. एवढेच नाही तर आगामी काळातील नुकसानही टाळता येणार आहे. अहवाल सादरपुणे येथील एमआयटीच्या संशोधकांनी संशोधन केलेल्या प्रकल्पाचा अहवाल भारतीय कृषी विज्ञान अनुसंधान केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला चाचण्यांचे दस्तावेज पाठविण्यात आले आहे. यात देशभरात २१ केंद्र उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. सहा पेटंटगारपीट रोधक यंत्रणेच्या यशस्वी प्रयोगानंतर या तंत्रज्ञानाचे सहा पेटंट मिळविण्यात आले आहे. यामध्ये गारांचे ढग शोधणारे रडार, ढगात रसायनाची फवारणी करण्याची पद्धत, कृत्रिम क्लाऊड चेंबर, जमिनीवरून ढगात मारा करणारे रॉकेट, त्यातील इंजेक्टेड पायरी कोटेड टेक्नीक, हेलिकॉप्टरवर आधारित आणि स्वयंचलित यंत्रणा तसेच गारपीट व्यवस्थापन पद्धती याचा समावेश आहे.
गारपिटीवर मात करण्यात तंत्रज्ञानाला यश
By admin | Published: August 08, 2014 1:05 AM