- श्रीनिवास भोसले लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या एकतर्फी विजयाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर नांदेडकरांनी पुनश्च शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली देगलूरची पोटनिवडणूक भाजपसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. परंतु, अशोक चव्हाणांनी जनतेसमोर मांडलेला विकासाचा अजेंडा, अंतापूरकर कुटुंबीयांविषयी असलेली सहानुभूती अन् ऐनवेळी भाऊजींनी मेहुण्यांना दिलेली साथ निर्णायक ठरली. त्यामुळे या निवडणुकीत पित्याच्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवत जितेश अंतापूरकर यांनी ४१ हजार ९३३ मतांनी भाजपचे सुभाष साबणे यांचा पराभव केला.
महाविकास आघाडीच्या राज्यपातळीवर झालेल्या निर्णयानुसार देगलूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली. काँग्रेसने अंतापूरकर कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली. यामध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. तर भाजपने पक्षातून उमेदवारी मागणाऱ्या १२ जणांना डावलून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. ऐनवेळी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा साबणे यांचा हा निर्णय शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला.
महाविकास आघाडी अधिक मजबूत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप आणि दुसरीकडे अशोक चव्हाण विरूद्ध प्रतापराव चिखलीकर असे चित्र मतदारसंघात तयार करण्यात आले होते. परंतु, चव्हाण यांनी विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडला. वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष करत महाविकास आघाडी सरकार एकजुटीने राज्याचा विकास करत आहे. हा विश्वास मतदारांना देण्यात पालकमंत्री चव्हाण यशस्वी ठरले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका गटाची छुप्या पद्धतीने मदत घेण्याचा भाजपचा डावही अशोकरावांनी हाणून पाडला.
खतगावकरांचे पाठबळ ठरले महत्त्वपूर्ण माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी ऐनवेळी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करत अशोक चव्हाण यांना साथ दिली. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण भाजप सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे ही निवडणूक खतगावकर यांच्यासाठीही प्रतिष्ठेची होती. त्यांच्या स्नुषा जि. प. सदस्या डॉ. मीनल खतगावकर यांनी युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जितेश यांच्या विजयासाठी घेतलेले परिश्रमही मताधिक्यासाठी कामी आले.