पुणे : सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड) पूर्वतयारी बैठकीपुढे (प्री-पीआयबी) पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे गुरुवारी यशस्वी सादरीकरण झाले. या बैठकीत काही सूचना आल्या असून, ७ दिवसांमध्ये त्या पूर्ण करून १५ दिवसांमध्ये पीआयबीपुढे हा प्रकल्प मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. शहराच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी प्री-पीआयबीची बैठक गुरुवारी झाली. या प्रकल्पावर केंद्राच्या विविध विभागांकडून अभिप्राय, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मेट्रोसाठी येणारा खर्च कसा उभारला जाणार, मेट्रो आर्थिकदृष्ट्या कितपत किफायतशीर ठरेल यावर चर्चा झाली. काही बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या ७ दिवसांत हे बदल केले जातील अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली.पुण्याच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोला २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने तत्त्वत: मान्यता दिली होती. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला. पुण्यानंतर नागपूर मेट्रोचा प्रस्ताव सादर होऊन त्याचे काम सुरू झाल्याने पुणेकरांमध्ये नाराजी होती. शहराचे खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना सातत्याने पुण्याची मेट्रो केव्हा होणार, हा प्रश्न विचारला जात होता. (प्रतिनिधी)
पुणे मेट्रोचे दिल्लीत यशस्वी सादरीकरण
By admin | Published: June 24, 2016 2:10 AM