मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उजव्या गुडघ्यावर शुक्रवारी सकाळी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. गुरुवारी केलेल्या चाचण्यांनंतर डॉक्टरांनी शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. पवार हे दिल्लीतील निवासस्थानी पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्या कमरेच्या हाडाला आणि उजव्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे उपचारासाठी त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. फारुख उदवाडिया आणि चमूने त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया केली. ती यशस्वी झाली असून किमान आठवडाभर त्यांना रुग्णालयातच राहावे लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. पवार यांच्यावर देखरेखीसाठी डॉक्टरांचा एक चमू तयार करण्यात आला आहे. पवार यांच्या कमरे हाडाला देखील दुखापत झाली असून, पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले आहे. या दुखण्यावरही त्यांच्यावर औषधोपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर पुढच्या तपासण्या करून पुढे कोणते उपचार करायचे हे ठरवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Published: December 06, 2014 3:42 AM