सातारा : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील त्यांच्याच वजनाएवढे लादलेले दप्तराचे ओझे कमी करण्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ज्ञानरचनावादाचा उतारा शोधला आहे. कृतीयुक्त शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे निम्मे वजन कमी झाले आहे.ज्ञानरचनावादामध्ये पुस्तकी अभ्यासापेक्षा कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला आहे. मुले स्वत: कृती, गतीने शिकतात. अनेक शाळांनी त्यासाठी शाळांची रंगरंगोटी केली आहे. फरशीवर वर्तुळ, चौकोन, आयत कायमस्वरूपी आखले आहेत. परिसरातील काड्या, गोट्या, दगडगोटे, तक्ते, पट्ट्यांचा वापर करून गणित, भूमिती शिकविले जाते. तसेच ध्वनिचित्रफितीतून विज्ञान शिकविले जाते. भूगोल विषयातही विद्यार्थ्यांना परिसरातील नदी, डोंगर, शेतात नेऊन अनुभवातून शिकवले जाते. गावातून फेरफटका मारून नकाशा तयार करणे व वाचन शिकविले जाते. त्यामुळे त्यांना भाषिक विषय वगळता अन्य विषयांची पुस्तके शाळेत आणण्याची गरजच भासत नाही. ज्ञानरचनावादात शैक्षणिक साहित्य शिक्षकच बनवत असून, ते वर्गातच ठेवले जात असल्याने केवळ वह्याच शाळेत घेऊन जावे लागते. काही शाळांमध्ये शासनातर्फे वॉटर फिल्टर मिळालेला आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटलीचे वजन दप्तरातून कमी झाले आहे.बदलते शिक्षण धोरण, दप्तराच्या ओझ्यावरील उपाययोजना बऱ्याचदा आपण शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांना लेखी स्वरूपात पाठवल्या आहेत़ याबाबत शासनच उदासीन आहे़ दररोजच्या ६ तासिकांपैकी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ज्या तीन तासिका घेतल्या जातात त्याच तासिका दुसऱ्या सत्रात घ्याव्यात़ उर्वरित विषयाच्या तीन तासिका दुसऱ्या दिवशी आणि पुन्हा दुसऱ्या सत्रात घेतल्यास दप्तराचे ओझे निम्मे कमी होणार आहे़ तसे पाहता प्रत्येक शिक्षकाला हजेरी घेण्यात, सूचना करण्यातच पहिली २० मिनिटे जातात़ केवळ १५ मिनिटांत शिक्षक अभ्यासक्रम किती शिकवणार?- ए़डी़ जोशीशिक्षणतज्ज्ञ, सोलापूर केवळ भाषिक पुस्तके वर्गात आणावी लागतात. हे टाळण्यासाठी उपाय शोधला आहे. जुनी पुस्तके विद्यार्थ्यांना वर्गातच ठेवायला दिली जातात. एकही पुस्तक वर्गात आणण्याची गरज नाही. तसेच दोन विषयांसाठी एक वही, गृहपाठासाठी पन्नास पानी वही करण्यास सांगितले जाते.- रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी, कऱ्हाड
ज्ञानरचनावादाचा यशस्वी उतारा
By admin | Published: July 09, 2017 12:35 AM