मुंबई:औरंगाबाद आणि उस्मनाबाद शहराच्या नामांतराबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी पहिल्यापासूनच विरोध केला आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून राजकीय वातावरण तापत असतानाच अबू आझमी यांनी खळबळजनक विधान केले. 'औरंगजेब हा वाईट व्यक्ती नव्हता', असे विधान अबू आझमी यांनी केले आहे. त्या विधानाचा आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी खरपून समाचेर घेतला.
काय म्हणाले अबू आझमी?'औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही', असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.
तरच मी नामांतराचे स्वागत करेन'महाराष्ट्रात औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद या तीन शहरांच्या नावात मुस्लीम नाव आहे. ही तीन नावं बदलल्याने जर महाराष्ट्रातील जनतेला नोकरी मिळणार असेल, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, विकास होणार असेल तर मी नामकरणाचं स्वागत करेन,' असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.