लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षात नाराजांची फौज तयार झाली असून विचारांची साथ सोडून एकमेकांसोबत आघाड्या युती करणाऱ्या पक्षांना कुठे ना कुठे या नाराजांनी झटका दिला आहे. अशातच अनेक नेते संधी साधून दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवत आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपाची साथ सोडणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
धैर्यशील यांचा राजीनामा मिळालेला असून त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेच्या राजीनाम्याबाबत मलातरी काही बोललेले नाहीत. रणजीत सिंह यांची भूमिका महायुती सोबत राहण्याची आहे. ते आमच्या सोबत राहतील. परंतु, धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही कोठेही कमी पडलो नाही. त्यांची मान, प्रतिष्ठा ठेवण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असा राजीनामा देणे योग्य नव्हते, अशा शब्दांत बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
आमदार नितेश राणे, धनंजय महाडिक यांच्या लोकांना प्रलोभने दाखविणाऱ्या विधानांवरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पैशाचे आमिष दिलेलं नसून विकासाचा प्रश्न मांडला आहे. आम्ही काही संन्यासी तर नाही, भाजपाचे पदाधिकारी आहोत. आम्ही एवढे काम करतो, मोदींनी देशासाठी संपूर्ण आयुष्य दिले आहे. तर आम्हाला वाटणे साहजिकच आहे की आम्हाला एवढी मते मिळायला पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
ईडीच्या कारवाया भाजप पेक्षा काँग्रेस सरकारच्या काळात जास्त झाल्या आहेत. या कारवाया भाजप करत नाही. ज्या सर्च रिपोर्टमध्ये येतात. त्यात कमी जास्तपणा आढळला तर चौकशी करतात. महाविकास आघाडीने आमच्या 50, 100 लोकांच्या चौकशा केल्या. त्यामुळे या कारवायांमध्ये प्रधानमंत्री किंवा प्रत्यक्ष सहभागी नसतो, असे कीर्तीकरांवरील कारवाईवर बावनकुळे म्हणाले.
महायुतीचे कोल्हापूरमधील उमेदवार संजय मंडलिक यांनी राजघराण्यावर टीका करून वाद ओढवून घेतला आहे. यावर बावनकुळेंनी हात झाटकले आहेत. संजय मंडलिक काय बोलले त्याचे उत्तर त्यांनीच दिले पाहिजे. किंवा एकनाथ शिंदेंनी दिले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.