ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारनं खूशखबर दिली आहे. मुंबई-गोवा एक्स्प्रेस वेची दुरवस्था झाल्यानं कोकणात जाणारी वाहनं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा जास्त करून वापर करतात. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 2 ते 4 सप्टेंबरपर्यंत टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय एमएसआरडीसी म्हणजेच सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
मात्र मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळविण्यासाठी जवळच्या वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातून काही दिवस आधी पास मिळवावा लागणार आहे. या पास नसल्यास टोलनाक्यावर कोणतीही सूट मिळणार नाही. संबंधित वाहन चालकांना आपल्या गाडीचा क्रमांक, स्थानिक पत्ता तसेच कोकणात जाणाऱ्या घराचा पत्ता यांचा पुरावा द्यावा लागणार आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पास धारकांनाच मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर टोल सूट मिळणार आहे.गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी 100 रुपयांत प्रवास- नितेश राणेगणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून टोलवसुली करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच गणेशोत्सवात कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी केवळ 100 रुपयांचं तिकीट देऊन लक्झरी बस सोडल्या आहेत. या बसचं बुकिंग नितेश राणे यांच्या वांद्र्यातील लिंकिंग रोड इथल्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयात होणार आहे.