Anjali Damania: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिवसागणिक नवे तपशील समोर येत आहेत. पवनचक्की कंपनीच्या बाहेर करण्यात आलेल्या मारहाणीमुळे आम्ही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले या आरोपीने दिल्यानंतर आता समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. "सुदर्शन घुले याचा जबाब अपूर्ण? सगळे लपवण्याचा प्रयत्न? एका स्टँडर्ड फॉर्मेटसारखा तीनही आरोपींचा जबाब आहे," असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
आरोपींच्या जबाबावरून तपास यंत्रणांवर प्रश्नांची सरबत्ती करताना अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, "खुनानंतर आरोपींनी पळून जायचं कसं ठरवलं? कोणी मदत केली, कुठे गेले, कृष्णा आंधळे कधीपर्यंत त्यांच्याबरोबर होता, कुणाच्या सांगण्यावरून ते पळाले, या काळात कराडशी बोलणं झाला की नाही, मुंडेंनी मदत केली का? ते कुठे-कुठे पळाले, भिवंडीला किती दिवस होते, कोणी पैसे पोहोचवले, मग ते पुण्यात कसे आले, कोणी यायला सांगितलं? कृष्णासोबत त्यांनी काय केलं? सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसा व कधी झाला ? डॉ. वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले? हे काहीच आरोपींच्या जबाबात आलेलं नाही," असं दमानिया यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांचा उलगडा तपास यंत्रणांकडून आगामी काळात केला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जयराम चाटेने जबाबात काय म्हटलंय?
मस्साजोग शिवारातील अवादा एनर्जी कंपनीच्या गोदामाच्या परिसरात ६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले व इतरांना सरपंच संतोष देशमुख व त्यांच्या गावच्या काही नागरिकांनी केलेली मारहाण ही सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच करण्यात आली, असा जयराम चाटे याने पोलिसांना जबाब दिल्याची माहिती समाज माध्यमांवर शुक्रवारी प्रसारित होताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. जयराम चाटे याने आपल्या जबाबात ९ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास सुदर्शन घुले, मावसभाऊ कृष्णा आंधळे, प्रतीक घुले सोबत असताना सुदर्शन घुले व इतरांना अवादा कंपनीच्या गोदामाच्या परिसरात झालेल्या मारहाणीमुळे वाल्मीक कराडची बीड जिल्ह्यात इमेज डाऊन झाली आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख याला ताब्यात घेऊन त्याला चांगलीच अद्दल घडवायची आहे, अशी बैठक वाल्मीक कराडच्या परळी येथील जगमित्र कार्यालयात झाल्याचे म्हटले आहे.