कणकवली - कोकण रेल्वे मार्गावरून मडगावच्या दिशेने धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६१८) ची अज्ञाताकडून तोडफोड करण्याबरोबरच जाळपोळ होणार असल्याचा संदेश कोकण रेल्वे प्रशासन , रेल्वे सुरक्षा बल, सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रणकक्ष यांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मिळाला . त्यामुळे कणकवली पोलीसांच्या पथकासह बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने कणकवली रेल्वेस्थानकात गाडीची तपासणी केली. मात्र, आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही . त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.सध्या देशात ठिकठिकाणी नव्या नागरीकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन पेटले आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वेच्या चेन्नई येथील दक्षिण विभागाकडून बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात एक संदेश आला. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६१८) ची अज्ञाताकडून तोडफोड करण्याबरोबरच जाळपोळ होणार असल्याचा तो संदेश होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत रेल्वे सुरक्षा बल तसेच स्थानिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली.त्यानंतर पोलिसांच्या सिंधुदुर्ग नियंत्रण कक्षाने कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी , हवालदार उत्तम पवार , कमलाकर साळसकर , अभजित तावडे , कैलास इंपार , राजकुमार खाडे , किरण मेषे , सुयोग पोकळे , रंजित जांभळे , नितीन बनसोडे , मंगेश बावधने यांचे पथक कणकवली रेल्वेस्थानकात दाखल झाले. तर ओरोस येथून बॉम्ब शोध व नाशक पथक हवालदार बाबा आंगणे , बाबु घाडीगावकर , नाना पिंगे , राहुल वेंगुर्लेकर , सिद्धार्थ तेंडुलकर , समीर कोचरेकर यांच्यासह कणकवलीत दाखल झाले. त्यांच्यासमवेत शेरा व लव्हली हे श्वान सुद्धा होते. तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक अरुण लोट , जवान राजेश कांदळकर, भूषण कोचरेकर, मेघशाम हेही उपस्थित होते. कणकवली रेल्वेस्थानकात गाडी येताच तिची तपासणी या सर्वानी केली. मात्र , अर्धातास तपासणी करूनही काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे सायंकाळी ६.३१ वाजता कणकवलीत दाखल झालेली ही रेल्वे ७ वाजून १ मिनिटांनी गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. दरम्यान, या अचानक तपासणी मुळे रेल्वे प्रवाशी गोंधळून गेले होते. यावेळी रेल्वे स्टेशन मास्तर रंजना माने व अन्य अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी रेल्वेस्थानकातही या गाडीची तपासणी करण्यात आली होती.
कणकवलीत एर्नाकुलम एक्स्प्रेसची अचानक तपासणी, रेल्वे जाळपोळीच्या संदेशामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 10:11 PM