ऑनलाइन लोकमत
देवळाली (नाशिक), दि. ३ - नाशिकमधील देवळाली कॅम्पमधील बेपत्ता जवान रॉय मॅथ्यूचा (वय ३३) मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रॉय हा २५ फेब्रुवारी पासून बेपत्ता होता, अखेर काल (गुरूवारी) देवळाली कॅन्टॉनमेंटमधील एका खोलीत रॉयचा गळफास घेतलेला, कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. रॉय मॅथ्यूचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जवानांची व्यथा मांडणारा एका व्हिडीओ व्हायरला झाला होता, ज्यामध्ये मॅथ्यूही दिसला होता. त्यावरून झालेला वाद आणि मॅथ्यूचा मृत्यू, याचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचाही शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉय मॅथ्यू गेल्या १३ वर्षांपासून लष्करात कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्पमधील जवानांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जवान वरिष्ठांच्या मुलांना शाळेत सोडणे-आणणे, तसेच त्यांची कुत्री फिरवणे अशी सहाय्यकाची कामे करताना दिसत होते. वरिष्ठ अधिका-यांकडून जाच होत असल्याचा आरोपही त्यामध्ये करण्यात आला होता. या व्हिडीओमुळे मोठा वादही निर्माण झाला. ब्रिटीशांच्या राजवटीतीप्रमाणे जवानांना सहाय्यकाची वागणूक देण्यात येत असल्याची टीकाही लष्करातील अधिका-यांवर करण्यात आली होती. याप्रकरणानंतर इतर जवानांसह मॅथ्यूचीही चौकशी करण्यात येत होती. त्यामुळे तो प्रटंड तणावात होता, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मात्र २५ फेब्रुवारीपासून तो अचानक गायब झाला आणि अनेक दिवस त्याचा काहीच पत्ता लागला नाही. मात्र गुरूवारी संध्याकाळी कॅम्पमधील एका निर्जन भागातील खोलीत त्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्यान एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत असून मॅथ्यूचा कोणी छळ केला होता का, (चौकशी प्रकरणामुळे) तो दबावाखाली होता का हेही तपासण्यात येत आहे.