नाशिक: सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील, बडगुजर हे छोटा मासा आहेत. बात निकली है, तो बहोत दूर तक जायेगी असे सांगत नाशिकचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बडगुजर यांचे समर्थक आणि व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या अन्य तिघांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. याबाबत दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी महाराष्ट्राच्या समोर येतील. 'मैं हूँ डॉन'वर बडगुजर हे अनेक क्रिमिनल आणि देशद्रोह्यांसोबत थिरकले, याचा संपूर्ण भारतीयांना राग आहे. बडगुजर हे छोटा मासा आहेत. बात निकली है. तो बहोत दूर तक जायेगी."
याचबरोबर, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सुधाकर बडगुजरांना सगळ्या गोष्टींची आठवण होईल. बडगुजर यांच्या चौकशीची मागणी नितेश राणे यांनी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे दादा भुसे म्हणाले. तसेच, यावेळी सुधाकर बडगुजर यांनी ललित ड्रग्ज प्रकरणी केलेल्या आरोपांवरही दादा भुसे यांनी भाष्य केले. ललित ड्रग्ज प्रकरण हे २०२० चे आहे. सुधाकर बडगुजर यांनीच त्याचा शिवसेना प्रवेश घडवून आणला होता. या प्रकरणात माझा अणु -रेणु इतकाही संबंध निघाला, तरी पद आणि राजकारण सोडून देईन, असे दादा भुसे यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत मुंबई बॉबस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासंदर्भात पार्टीचा मुद्दा उपस्थित केला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतचा फोटो आणि व्हिडिओ विधानसभेत दाखवण्यात आला. नितेश राणे यांनी यासंदर्भातील एका व्हिडिओचा दाखवला. त्यात 'मै हूँ डॉन गाण्यावर', सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचा डान्स आहे. या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.
बडगुजरसह तीन जण चौकशीच्या फेऱ्यातठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बडगुजर यांचे समर्थक आणि व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या ३ जणांची पोलिसांनी चौकशी केली. पवन मटाले, रवी शेट्टी, सरप्रीतसिंग या तिघांची पाच तास चौकशी केली. सलीम कुत्ता याच्यासोबत ओळख, भेट आणि संबंध कसा आला, याबाबत पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सलीम कुत्ता याचे नाव मोहम्मद सलीम मीर शेख आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.