पनवेल : जनतेने नगरसेवकाच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी पालिकेवर पाठविले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे काम आणखी सोपे होऊन ताण कमी होणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना दिली. १ जून रोजी शिंदे यांनी दुसऱ्यांदा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त पद स्वीकारले. पनवेल पालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली होती. याचे कारण राज्य शासनाकडून स्पष्ट झाले नसले तरी डॉ. सुधाकर शिंदे हे भाजपाचे मंत्री राम शिंदे यांचे बंधू असल्याने ही बदली झाल्याची चर्चा होती. शिंदे यांच्या बदलीविरोधात पनवेल, खारघर शहर, कामोठे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. पनवेल महानगरपालिका संघर्ष समितीने याकरिता मोर्चादेखील काढला होता. शिंदे यांनी पालिकेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून पनवेल शहरासह पालिका क्षेत्रातील अतिक्रमण, अनधिकृत फेरीवाले आदींसह सर्वच प्रकारच्या अनधिकृत व्यवसायांना लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलली होती. या निर्णयाचे स्वागतदेखील करण्यात आले होते. त्याचप्रकारे फेरीवाल्या संघटनांकडून शिंदेंविरोधात जेल भरोसारख्या गोष्टीदेखील खारघरमध्ये घडल्या होत्या. या वेळी शिंदे यांनी, पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार, शहर स्वच्छ व सुंदर, स्मार्ट बनविण्याचे आमचे ध्येय आहे. अनधिकृत बांधकाम असतील ती कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्यात येतील. कर्मचारी भरती, सिडको नोड हस्तांतरण, अशा प्रकारच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राजेंद्र निंबाळकर परत उल्हासनगरला येणार?उल्हासनगर : सुधाकर शिंदे यांची गुरुवारी पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्याने उल्हासनगर महापालिका नवीन आयुक्ताच्या प्रतीक्षेत असून, राजेंद्र निंबाळकर उल्हासनगरात परत येणार असल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीपुरते दोन्ही आयुक्तांचे खांदेपालट झाल्याचे शिंदे व निंबाळकरांसंदर्भात बोलले जात होते. दरम्यान, गुरुवारी शिंदे यांची बदली झाली. मात्र, निंबाळकर यांच्या बदलीचे पत्र अद्याप आले नसून ते उद्यापर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुधाकर शिंदे पुन्हा आयुक्तपदी
By admin | Published: June 02, 2017 3:34 AM