मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्तारोको व निदर्शने केली. केंद्रातील भाजपा सरकार सुडाचे राजकारण करीत असून, जनता ही दडपशाही कदापी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नवी दिल्लीतील न्यायालयाने विनाअट जामीन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, ‘काँग्रेस कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा देत आहे. काँग्रेसची बाजू सत्य आणि स्पष्ट असून, सत्याचाच विजय होईल. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसला बदनाम करण्याची सुपारीच उचलली आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची क्षमता नसल्यानेच काँग्रेसला लक्ष्य करण्याची खेळी भाजपाने केली आहे. भाजपाला देशात विरोधी पक्षच नको आहेत. त्यांची लोकशाहीविरोधी मानसिकता लोकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच जनतेने बिहार विधानसभा निवडणुकीसह विविध पोटनिवडणुका आणि गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला नाकारले आहे. म्हणूनच जनतेची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस नेत्यांवर चिखलफेक करण्यात येत आहे, असे चव्हाण म्हणाले. काँग्रेसचा रास्ता रोको केंद्र सरकारच्या निषेधार्थ खेरवाडी जंक्शन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, आजीमाजी खासदार-आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रास्ता रोको केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्नही केला. यानंतर पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले व नंतर त्यांची सुटका केली.
भाजपाकडून सुडाचे राजकारण
By admin | Published: December 20, 2015 1:04 AM