ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - शिवसेनेच्या नाकावर टिच्चून मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणारे सुधींद्र कुलकर्णी आता त्याच पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी पाकिस्तानला जाणार आहेत. 'नायदर अ हॉक नॉर अ डव्ह' या पुस्तकाचे प्रकाशन २ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानमध्ये होणार असून त्या सोहळ्यासाठी मिळालेले निमंत्रण आपण स्वीकारले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना तीव्र विरोध दर्शवत शिवसेनेने प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई व पुण्यात होणारा कार्यक्रम रद्द करायला लावला होता. त्यानंतर सुधींद्र कुलकर्णी यांच्या 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनालाही शिवसेनेने विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतरही हा सोहळा होणारच या भूमिकेवर ठाम असलेल्या सुधींद्र कुलकर्णींवर शिवसैनिकांनी शाई फेकली होती. शिवसैनिकांच्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकाशन सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले. शिवसैनिकांनी केलेल्या अपमानानंतरही कुलकर्णी यांनी कसुरी यांच्यासह नेहरू सेंटरमध्ये या पुस्तकाचे यशस्वीरित्या प्रकाशन केले. मात्र सेनेचा पाकिस्तान विरोध अद्यापही शमला नसून पाकिस्तानी नागरिकांना सुरक्षा देणा-या सत्तेतील आपल्याच मित्रपक्षावर शिवसेनेने वेळोवेळी टीकास्त्र सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवरही सुधींद्र कुलकर्णी पाकिस्तानला जाणार असून १ ते ४ नोव्हेंबर दरम्यानच्या या पाक दौ-यासाठी आपण अतिशय उत्साही असल्याचे ते म्हणाले. दोन नोव्हेंबर रोजी पार पडणा-या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण दिल्याबद्दल मी कसुरी यांचा आभारी आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या शांतताप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक मोलाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.