ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १ - पिशवीतल्या सहकारी संस्थांच्या जीवावर राजकारण करून संस्था, बँका, सुत गिरण्या, सोसायटी संस्था, पतसंस्था, साखर कारखान्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता मिळविली़. सर्वसामान्य शेतक-यांना कर्जे देण्याऐवजी बँकेच्या संचालकांनी आपल्याच उद्योगांना बेकायदेशीररित्या कर्जे मंजूर करून घेतली़ या भ्रष्ट्र कारभारामुळेच आघाडी सरकारच्या काळात राज्यातील बँका व सुतगिरण्या बुडाल्या़. राज्याचा सर्वांगीण विकास करताना कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण आम्ही करणार नाही व आमची ती औलादही नाही असा खरमरीत टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधकांना लगावला़
राज्यातील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोन वर्षात करण्यात आलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते़ यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, लोकमंगल उद्योग समुहाचे संचालक अविनाश महागांवकर, उत्तर तालुका भाजपाचे अध्यक्ष आप्पासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते़
यावेळी बोलताना सहकारमंत्री म्हणाले की, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्याच नावावर बेकायदेशीररित्या कर्जे घेऊन बँका बुडविल्या. या बुडविलेल्या बँकांना ऊर्जावस्थेत आणण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. भाजप सरकार सहकार खाते मोडीत काढण्याचा प्रयत्न करतय अशी टिका करणा-या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ५७ सहकारी साखर कारखाने कोणी विकत घेतल्या, जिल्हा बँका, साखर कारखाने कोणी मोडीत काढले याचे उत्तर द्यावे.
राज्यात आगामी काळात सहकार क्षेत्र वाढविण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्र वाढविण्यावर भाजप सरकार जास्तीचा भर देणार आहे. राज्यातील बंद पडलेल्या सुतगिरण्या सुरू करण्याचा भाजप प्रयत्न करीत आह. त्यासाठी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करून एक दिलासा सूतगिरण्यांना देण्याचा प्रयत्न लवकरच भाजप सरकार करणार आहे. शिवाय शेतक-यांना एफआरपीप्रमाणे रक्कम न देणा-या साखर कारखान्यांची खासगी मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले.
भाजप सरकारच्या कामगिरीवर एक नजर
भाजप सरकारने दोन वर्षाच्या कालावधीत जलयुक्त शिवार योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, मुद्रा योजना, अन्नसुरक्षा योजना, कृषीपंपांना त्वरीत वीजजोडणी, पोलीसांना घरे, बँकींग क्षेत्रात वेगवेगळे बदल यासारखे नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणून सर्वसामान्यांना सेवासुविधा पुरविण्यावर जास्तीचा भर दिल्याचेही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.