ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारे महाराष्ट्राचे विक्रमवीर वनमंत्री, यशस्वी वित्तमंत्री आणि भाजपाचे विदर्भातील दिग्गज नेतृत्व असलेले सुधीर मुनगंटीवार सर्वात प्रभावी राजकारण्यांमधील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरले आहेत. अभिनेते रझा मुराद यांच्या हस्ते मुनगंटीवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजपाचे पुण्यातील दिग्गज नेते गिरिश बापट, काँग्रेसचे नेते नारायणराव राणे आणि भाजपाचे नेते सुभाषबापू देशमुख यांना या विभागात नामांकन मिळालेले असल्याने या विभागात बाजी कोण मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यात अखेर सुधीर मुनगंटीवार यांना वाचकांची आणि परीक्षक मंडळाची पसंती मिळाली.
मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा सुरू आहे. आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरविण्यात येत आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या कारकीर्दीविषयी थोडक्यात माहिती
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करता-करता राजकारणात आलेले आणि २ कोटी ८२ लाख वृक्षांची विक्रमी लागवड करून, ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव कोरलेले देशातील एकमेव वनमंत्री! जल, जंगल आणि जीवन, या त्रिसूत्रीवर काम करणारा मंत्री ही त्यांची आजची चपखल ओळख. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनजमीन असलेल्या विदर्भातून आलेला हा नेता वन, वन्यजीव आणि वनौपज, यावर तळमळीने बोलतो. जंगलांची खडान् खडा माहिती, तोंडपाठ आकडेवारी आणि हातातील नोटबुकवर साठवलेली अगणित चित्रे, छायाचित्रे आणि डॉक्युमेंटरिज् दाखवून समोरच्यांना देशभरातील राष्ट्रीय अभयारण्यांची सफर घडवून आणण्यात त्यांचा विलक्षण हातखंडा! चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात शिकत असताना, छात्रसंघाच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक कार्यात उडी घेतली आणि चंद्रपूरसारख्या आडवळणाच्या जिल्ह्यात त्यांनी भाजपाचे रोपटे लावून त्याचा वेलू गगनावर नेला. जिल्हा पातळीवरील पक्ष संघटनेच्या कामातील त्यांची तळमळ आणि धडाडी पाहून १९९५ मध्ये त्यांना चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. मुनगंटीवार निवडून आले आणि अवघ्या वर्षभरात त्यांची पर्यटन व ग्राहक संरक्षणमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागली. मुनगंटीवारांना पूर्वीपासूनच जंगलांबाबत लळा होता. पर्यटनमंत्री म्हणून त्यांनी पर्यटकांनाही जंगलात आणले. मुनगंटीवारांच्या कामाचा झपाटा पाहून मतदारांनी त्यांना चंद्रपूरमधून तीन वेळा आणि बल्लारपूरमधून दोन अशा सलग पाचव्यांदा विधानसभेवर निवडून दिले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढलेच, शिवाय तत्कालीन सरकारच्या विरोधात आंदोलने करून सरकारच्या नाकीनऊ आणले. बल्लारपूर तालुक्याची निर्मिती, चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना, जिल्ह्यात दारूबंदी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या फुलपाखराला राज्याचे फुलपाखरू म्हणून मानचिन्ह आणि ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्प अशा कितीतरी वैशिष्टयपूर्ण कार्याची नोंद मुनगंटीवार यांच्या नावे आहे. एलबीटी माफी आणि टोलमाफी करून त्यांनी व्यापारी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. एक कार्यक्षम मंत्री आणि ‘मॅन ऑफ दी ग्रीन आर्मी’ ही सुधीर मुनगंटीवार यांची ओळख बनली आहे! "वृक्षवल्ली आम्हा सोयरे..." यावर श्रद्धा असलेल्या मुनगंटीवार यांनी वृक्षारोपणाची अभिनव मोहीम हाती घेतली, ती निरंतर सुरू ठेवली. लावलेले प्रत्येक झाड जगविण्यासाठी सरकारी यंत्रणेला प्रेरणा दिली. त्यातून महाराष्ट्राचे ग्रीन कव्हर वाढविले. ग्रीन थम्ब या जागतिक संकल्पनेशी एकरूप झालेल्या मुनगंटीवार यांची राजकीय पाळेमुळे या कामातून आणखी खोलवर रुजली आहेत.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा