Sudhir Mungantiwar News: २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून घेतलेल्या ताठर भूमिकेनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक घडवून आणलेल्या शपथविधीमुळे खळबळ उडाली होती. मात्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेले सरकार अवघ्या काही तासांतच कोसळले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला असून, भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती फायनल झाली होती. पवार साहेबांनी पालकमंत्री आणि जिल्हे वाटप सुद्धा केले होते. त्यानंतर ते माघार फिरले. देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सांगितले ते शंभर टक्के खरे आहे. शरद पवार यांचा जो काही राजकीय प्रवास आहे, इतिहास आहे, ते पाहिले तर फडणवीस जे म्हणत आहेत ते खरे आहे, असे दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
कोणत्याही राजकीय पक्षात असे कधी होत नाही
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जातील असे आम्हांला कधीच वाटले नव्हते. आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठे मन केले. त्यांना जागा दिल्या. पण तेव्हाही बेइमानी झाली. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवारही दिला होता. साताऱ्यातील भाजपचा उमेदवार हा शिवसेनेचा म्हणून दिला होता. कोणत्याही राजकीय पक्षात असे कधी होत नाही. पण आम्ही ते केले, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंबद्दल मला अनेकवेळा सहानुभूती राहिली आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांना अनेक वेळा सांगितले की तुमची वाट चुकत आहे. दुटप्पी भूमिका कशी घेता येईल, यावर ठाकरे गटाचा जोर असतो, अशी टीका करताना, समान नागरी कायद्याचा अर्थ काय? आमचा देश जाती-धर्मापेक्षा मोठा आहे. यावर मंथन सुरू आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.