Supriya Sule Vs BJP News: लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे सांगितले जात आहे. जाहीर केलेल्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधक सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर टीका करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली असून, भाजपाकडून याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांना राजकारणातून संपुष्टात आणण्यासाठी भाजपा आता उतरली आहे. भाजपाला महाराष्ट्रात विकास करायचा नाही. भाजपाला भ्रष्टाचाराच्या विरोधात जायचे नाही. त्यांना बेरोजगारीबाबत लढा द्यायचा नाही. त्यांना महागाई कमी करायची नाही. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे. जो कोणी नेता महाराष्ट्राची आन-बान-शान दिल्लीत गाजवतो, त्याला राजकारणातून संपवायचे, अशी कबुली भाजपानेच दिली आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला. यावर, भाजपा नेते आणि चंद्रपूर लोकसभेसाठीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.
तुमच्या घरातील पुतण्या बिभिषण म्हणून आमच्याकडे येतो
तुमच्या घरातील पुतण्या तुमच्या विरोधात जातो आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता. तुमच्या घरातील पुतण्या बिभिषण म्हणून आमच्याकडे येतो आणि तुम्ही आम्हाला सांगायचे. तुमची आजपर्यंतची काय सवय आहे की, शेकापचे उमेदवार सख्खे भाऊ होते, तेव्हा शरद पवारांनी काय केले. त्यांचा विश्वासघात केला. तुमची तुमच्या कृतीने आणि चुकीने स्वतःच संपत आहात, या शब्दांत मुनगंटीवार यांनी पलटवार केला.