Sharad Pawar On Bhatakti Aatma : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीशरद पवार यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' म्हणून केला होता. मोदींनी केलेल्या टीकेवर निकालानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं आहे. भटकती आत्मा म्हणत मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भटकती आत्म्याच्या त्रास काही दिवस होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
सोमवारी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वार्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान मोदींनी पुण्यात महायुतीच्या सभेत शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. "मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात, काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे," अशा शब्दात मोदींनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. भटकती आत्मावरुन शरद पवारांचं प्रत्युत्तर
"आम्ही राजकीय पक्ष म्हणून एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी. माझ्या बाबतीत बोलले. माझ्या बाबतीत विधान काय तर हा भटकता आत्मा आहे. माझा त्यांनी असा उल्लेख केला की हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीनं बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहाणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
भटकती आत्म्याच्या त्रास काही दिवस - सुधीर मुनगंटीवार
"तुम्ही भटकती आत्म्यावरील कोणताही चित्रपट पाहून घ्या. पहिल्यांदा काही दिवस भटकती आत्म्याचा त्रास होतो पण काही दिवसांनी कोणीतरी येतो आणि त्या आत्म्याला एवढं शांत करतो. भटकत्या आत्म्याचा त्रास काही दिवस होईल. पण त्यापुढे होणार नाही," असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.