नानासाहेब धर्माधिकारी यांना त्याच मैदानावर २००८ मध्येही महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला होता. यावेळपेक्षा अधिक लोक तेव्हा उपस्थित होते. कालचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात घेतला असता तर ही दुर्घटना टळली असती. जमलेले लोक हे धर्माधिकारींना आणल्याचे जे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले, ते लांच्छनास्पद आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
२००८ मध्ये कार्यक्रमाची व्यवस्था आम्ही पाहतो असे श्री संप्रदायाने सांगितले होते. त्यावेळी तो कार्यक्रम यापेक्षा भव्यदिव्य असा कार्यक्रम झाला होता. हे महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला माहित आहे. श्री सेवकांची गर्दी होणार हे सरकारला माहित होते. तेव्हा योग्य त्या पध्दतीने आयोजन करायला पाहिजे होते. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची मी निंदा करतो, असे पटोले म्हणाले.
धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमाला जमलेले लोक त्यांनीच आणले होते, असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले आहे. अशाप्रकारे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीवर असे आरोप करणे चुकीचे आहे. हे लांच्छनास्पद वक्तव्य आहे. हा सरकारचा कार्यक्रम होता. यामुळे सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणीही पटोले यांनी केली.
याचबरोबर अजित पवार हे शरद पवारांना विचारूनच भाजपात जातील या रवी राणांच्या वक्तव्यावर राणा राष्ट्रवादीचे प्रवक्ते कधी झाले हे आपल्याला माहिती नाही, असे उत्तर दिले. तसेच ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, त्यावर बोलणे उचित होणार नाही, असेही पटोले म्हणाले.