पुणे : राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता उस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांची स्थिती अतिशय गंभीर असून मराठवाड्यातील ६० ते ७० कारखान्यांपैकी केवळ ५ कारखानेच सुरू राहतील, सोलापूर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने साखर कारखान्यांपुढे मोठे आर्थिक संकट आहे, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मंगळवारी येथे सांगितले.महाराष्ट्रातील साखर कामगार संघटनाच्या सुधारित वेतन कराराबाबत तसेच कामगारांच्या मागणीसाठी साखर संघ आणि साखर कामगारांच्या प्रतिनिधींची खास बैठक पवार यांच्या उपस्थितीत साखर संकुल येथे बोलविण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्य शासनाच्या वेतन करार समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी साखर कामागारांचा वेतन करार संपलेला आहे. सुधारित वेतन करारासाठी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याबाबत समितीने कामगार आणि संघाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यात तोडगा निघू शकला नाही. (प्रतिनिधी)
साखर कारखान्यांची स्थिती गंभीर
By admin | Published: June 22, 2016 4:25 AM