कोल्हापूर : गेल्या वर्षीचा दुष्काळ व काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन कमी होणार असल्याने, त्याची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. १० आॅक्टोबरपासून हंगाम सुरू करण्यास साखर आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असला, तरी आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी असल्याने नोव्हेंबरमध्येच कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत.यंदा कर्नाटकातही ऊस कमी असल्याने विशेषत: सीमा भागातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. जानेवारी ते जूनपर्यंत पाणीटंचाईने ऊस पीक अक्षरश: होरपळून गेले. अनेक ठिकाणी उसाच्या लावण्या कशातरी जगल्या आणि खोडवी काढून टाकली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी एक कोटी ४६ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. यंदा एक लाख ३२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. खोडव्याचे एकरी उत्पादन घटणार असल्याने सर्वच कारखान्यांना सुमारे ३० टक्के ऊस कमी पडेल. ऊस कमी असल्याने कर्नाटकातील कारखान्यांचे लक्ष राज्यातील उसावर आहे. विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखाने नोव्हेंबर महिन्यात सुरू होतात, तोपर्यंत सीमाभागातील ऊस उचलण्याचे तेथील कारखान्यांनी ठरविलेले दिसते. उसाच्या पळवापळवीमुळे आॅक्टोबरमध्ये कारखाने सुरू केले, तर परिपक्व नसणाऱ्या उसामुळे कमी उतारा येण्याची भीती कारखानदारांमध्ये आहे. (प्रतिनिधी)
साखर कारखान्यांची धुराडी नोव्हेंबरमध्येच पेटणार!
By admin | Published: September 12, 2016 4:18 AM