सोलापूर: आरआरसी कारवाईनुसार जप्त केलेली साखरही लिलावात कोणी घेत नसल्याने आता साखर विक्री करून एफआरपीनुसार शेतकºयांचे पैसे देण्याची सवलत शासनानेच साखर कारखान्यांना दिली आहे. दरम्यान, सध्या राज्यातील ९० कारखान्यांंकडे ११७० कोटी रुपये इतकी रक्कम अडकली आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी थकविणाºया कारखान्यांना नोटिसा देणे व आरआरसी कारवाईची प्रक्रिया करण्यास जानेवारीपासूनच सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी शेतकºयांचे पैसे दिले आहेत. साखर विक्री करून,इथेनॉलच्या पैशातून किंवा वीज विक्री करून शेतकºयांचे उसाचे पैसे देण्याची सवलत कारखानदारांना दिली होती. त्याप्रमाणे राज्यातील १०५ साखर कारखान्यांनी १५ जूनपर्यंत एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मे महिन्यात सुनावणी घेऊन एफआरपी देण्याची संधी दिल्यानंतरही शेतकºयांचे पैसे देण्यासाठी हयगय करणाºया राज्यातील ७७ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे दिले आहेत.
सध्या ९० कारखान्यांकडे ११७० कोटी रुपये एफआरपीनुसार शेतकºयांचे देणे आहे. आरआरसीच्या कारवाईनुसार साखर जप्त केली तरीही त्याची विक्री होत नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हीच साखर विक्री करा व एफआरपी चुकती करा अशा सूचना साखर कारखान्यांना साखर सहसंचालक कार्यालयातून सांगितल्या आहेत. जूनअखेरपर्यंत शेतकºयांचे पैसे द्या असे कारखानदारांना सांगितले जात आहे. आता कारखाना काय करणार?, याकडे लक्ष लागले आहे.
आरआरसीत अडकले ६२४ कोटी- आरआरसी केलेल्या ७७ कारखान्यांकडे ६२४ कोटी रुपये थकबाकीपोटी अडकले. - ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ६० इतकी आहे.- ६० ते ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या २२ इतकी आहे. - ५० टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ८ इतकी आहे.
४८४ कोटी अडकलेसोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम घेतलेल्या ३१ पैकी ६ कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकºयांचे पैसे दिले असून २५ कारखान्यांकडे ४८३ कोटी ६० लाख रुपये इतकी शेतकºयांची रक्कम अडकली आहे. यापैकी सिद्धनाथ कारखान्यांवर ३४ कोटी थकबाकीमुळे सव्वालाख क्विंटल साखर जप्तीची कारवाई केली आहे.
राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २३ हजार ८९ कोटी रुपये देणे होते. त्यापैकी २१ हजार ९३२ कोटी रुपये शेतकºयांना दिले असून एफआरपीनुसार ५ टक्के रक्कम देणे आहे. कारखान्यांतील साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -शेखर गायकवाड, साखर आयुक्त