इस्लामपूर (जि. सांगली) : साखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही, मात्र केवळ ११ महिन्यांत १३२ कोटी रुपये दिले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांना नाव न घेता लगावला. काँग्रेस आघाडीने सत्तेत असताना १0 वर्षे स्वामिनाथन् आयोग का गुंडाळून ठेवला होता, असा सवालही त्यांनी केला.इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, सिंचनाचा अभाव, निसर्गाची अवकळा, अवर्षण आणि पिकलेच, तर बाजारभाव कोसळतो. अशा तिहेरी संकटात शेतकरी नेहमी सापडत आला आहे. मात्र आमचे सरकार याबाबत गंभीर आहे.पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत पाणी योजनांसाठी पाच हजार कोटींचा निधी दिला आहे.युती सरकारच्या काळात सांगली जिल्ह्यात पूर्णत्वाकडे आलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजनांची कामे आघाडी सरकारने १५ वर्षांत पूर्ण केली नाहीत. आम्ही या योजना पूर्ण करून ५0 हजार एकर जमीन ओलिताखाली आणणार आहोत.
साखर कारखाने, संस्था काढून स्वत:ची घरे भरायची नाहीत- देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:54 AM