पुणे : अडचणीत आलेल्या राज्यातील ३४ साखर कारखान्यांकडे राज्य सहकारी बँकेची तब्बल ५३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या रक्कमेची वसुली करण्यासाठी राज्य बँकेने कारखाने भाडेतत्वावर देण्याचा प्रयोग सुरु केला आहे. असे सहा कारखाने भाड्याने दिले असून, त्यातून वार्षिक २० कोटी रुपयांची रक्कम बँकेच्या खात्यात जमा होत आहे. कारखाने सुरु झाल्याने शेतकऱ्यांना देखील हक्काचा कारखाना उपलब्ध झाला आहे. आर्थिक अनियमितता, कमकुवत व्यवस्थापन, सातत्याने झालेला दुष्काळ अशा विविध कारणांमुळे राज्यातील अनेक कारखाने अडचणीत आले आहेत. या कारखान्यांनी राज्य सहकारी बँकांसह विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. कारखानाच बंद झाल्याने शेकडो कोटी रुपयांची कर्ज खाती अनुत्पादित (एनपीए) झाली आहेत. कारखान्यांची मालमत्ता विकून कर्ज रक्कम वसुल करण्यात अनेक कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे थकीत कर्ज रक्कमेची काही प्रमाणात तरी वसुली व्हावी यासाठी राज्य सहकारी बँकेने १० ते २० वर्षे कराराने कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत माहिती देताना राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख म्हणाले, कर्ज थकबाकीमुळे राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले ३४ साखर कारखाने अवसायानात (लिक्विडेशन) काढले आहेत. त्यांच्याकडे ५३८ कोटी रुपये थकीत आहेत. त्यातील रयत, उदयसिंह गायकवाड, माणगंगा, भाऊसाहेब बिराजदार, शेतकरी सोनी, वसंतदादा, शेतकरी किल्लारी हे कारखाने १० ते २५ वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर दिले आहेत. या कारखान्यांकडून वर्षाला २० कोटी रुपये बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. ----यशवंतच्या जमिनीच्या मूल्यांकनासाठी समिती : विद्याधर अनास्करथेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची काही जागा विकून कारखाना चालू करण्यास उच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती जागेचे मूल्यांकन करणार आहे. या कारखान्यावर इतर बँकांचे देखील कर्ज आहे. त्यांचे कर्ज घेण्याची तयारी राज्य बँकेने दाखविली आहे. संबंधित बँकांशी त्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. ----मार्केटयार्डातील जागा राज्य बँकेच्या ताब्यात मार्केटयार्ड येथील भू विकास बँकेची ३२ गुंठे जागा लवकरच राज्य सहकारी बँकेकडे हस्तांतरीत होईल. त्यासाठी बँकेने भरलेली २४.७१ कोटी रुपयांची निविदा मंजुर झाली आहे. या जागेवर सहकार प्रशिक्षण संकुल उभारण्यात येईल. साखर कारखान्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उभारणे, तसेच इतर सहकारी संस्थांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी विविध अभ्यासपूर्ण उपक्रम या माध्यमातून राबवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.
कर्ज वसुलीसाठी साखर कारखाने दिले भाड्याने : राज्य बँकेचा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 2:57 PM
आर्थिक अनियमितता, कमकुवत व्यवस्थापन, सातत्याने झालेला दुष्काळ अशा विविध कारणांमुळे राज्यातील अनेक कारखाने अडचणीत आले आहेत...
ठळक मुद्देराज्यातील ३४ कारखान्यांकडे ५३८ कोटींची थकबाकीया कारखान्यांकडून वर्षाला २० कोटी रुपये बँकेच्या खात्यात जमामार्केटयार्डातील जागा राज्य बँकेच्या ताब्यात न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती