पुणे : राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा केला असून, त्यातील साडेसात कोटी लिटर इथेनॉल सहकारी साखर कारखान्यांनी तयार केले आहे. गुजरात, तेलंगणा, तमिळनाडून, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक या राज्यांनाही इथेनॉलचा पुरवठा केला आहे. सन २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. उसापासून तयार होणाऱ्या मोलॅसिसपासूनच नव्हे तर, उसाचा रस, खराब धान्य, सडलेले बटाटे, मका आणि अधिक उत्पादन झालेले धान्य या पासूनही इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. देशातील ऑईल कंपन्यांनी साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या युनिटशी २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे. राज्यातील ७२ कारखान्यांची इथेनॉल निर्मितीची क्षमता ५७ कोटी १८ लाख लिटर आहे. ऑईल कंपन्यांनी सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना ४७ कोटी ६४ लाख ९ हजार लिटर इथेनॉल निर्मितीचा कोटा दिला आहे. सहकारी कारखान्यांची ४० कोटी २७ लाख ५० हजार लिटर इथेनॉल निर्मिती क्षमता आहे. मात्र, सहकारी कारखान्यांना २० कोटी ३३ लाख ७७ हजार लिटर इथेनॉलचा पुरविण्याचा कोटा मिळाला आहे. मार्च अखेरीस, १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला असून, त्यात ७ कोटी ६६ लाख ६६ हजार लिटर इथेनॉल सहकारी कारखान्यांनी पुरविले आहे. अजून राज्यातून २२ कोटी ४४ लाख ९४ हजार लिटर इथेनॉल पुरविणे अपेक्षित आहे. ----------------वारणा कारखान्याकडे लक्षकोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखान्याने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने साखर उद्योगाचे त्याकडे लक्ष लागले आहे. वारणा कारखान्याला १ कोटी ४५ लाख ५९ हजार लिटरचा कोटा मिळाला आहे. त्यापैकी २६ लाख ५३ हजार लिटर इथेनॉलचा मार्च अखेरीस पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान खंडोबा डिस्टीलरीज (१० कोटी ४२ लाख ३ हजार लिटर), गंगामाई इंडस्ट्रीज (२ कोटी ६२ लाख ५० हजार लिटर) आणि पद्मश्री विखे-पाटील सहकारी कारखाना (१ कोटी ३१ लाख २१ हजार लिटर) हे सर्वाधिक इथेनॉल पुरवठा करणारे राज्यातले पहिल्या तीन क्रमांकाचे कारखाने आहेत.
साखर कारखान्यांनी केला साडेतेरा कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:15 PM
देशातील ऑईल कंपन्यांनी साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या युनिटशी २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे.
ठळक मुद्देसहा राज्यांना पुरवठा : राज्यातील कारखान्यांना ४७ कोटी लिटरचा कोटाराज्यातील ७२ कारखान्यांची इथेनॉल निर्मितीची क्षमता ५७ कोटी १८ लाख लिटर