सोलापूर : युतीचे सरकार शेतकरीविरोधी असून राज्यातील साखर कारखानदारी मोडून काढण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला. शेतकरी, कष्टकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री परदेशात जातात, अशी टीकाही त्यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी सहकाराची चळवळ उभी केली. शरद पवार केंद्रात असताना शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. सध्याचे सरकार शेतकऱ्यांचा कसलाच विचार करणारे नाही. पंतप्रधान तर परदेश दौऱ्यावरच असतात, अशी टीका त्यांनी केली.यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल, आ. बबनराव शिंदे, आ. हणमंत डोळस, राकाँ जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. मुंडे, तावडेंनी राजीनामा द्यावाच्महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळा तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवी व अग्निशमन यंत्रात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर येत आहे़ जोपर्यंत आरोपांची शहानिशा होत नाही, तोपर्यंत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.रमेश कदम चुकीचेच़़़प्रशासनाविरोधात दबाव आणण्यासाठी हजारोच्या संख्येने काढलेला मोर्चा हा चुकीचाच आहे़ शिवाय अटक करणार नाही, असे पोलिसांचे पत्र असतानाही अटक करण्यासाठी आ़ रमेश कदम यांनी पोलिस ठाण्यावर धाव घेणे अयोग्य आहे़ त्यांना तूर्तास पक्षातर्फे समज देणार आहे़ त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
साखर कारखानदारी मोडीत काढण्याचे धोरण
By admin | Published: July 07, 2015 1:44 AM