सुरेश भटेवरा, नवी दिल्ली देशात डाळींचे भाव कडाडण्याची स्पष्ट चिन्हे असताना आता साखरेचाही गोडवा कमी होण्याची भीती आहे. भारताच्या साखर उत्पादनात यंदा मोठी घट असून, त्यामुळे साखरेचे भाव प्रति किलो ५० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. सध्या साखर साधारणत: ४0 रुपये किलोने मिळत असून, महिनाभरात हा भाव सरासरी १० रुपयांनी वाढेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदाच्या एफआरपीनुसार ऊस उत्पादकाला साधारणत: २००० ते २४00 रुपये प्रति टन भाव मिळाला. ग्राहकांना सध्या ४0 रुपये किलोने साखर मिळते आहे. कमी उत्पादनामुळे साखरेचे भाव वाढल्यास त्यास सरकारचे धरसोडीचे धोरण जबाबदार असेल, अशी टीका लातूरच्या मांजरा सहकारी साखर कारखाना परिवारातील ५ साखर कारखान्यांचे संचालन करणारे आमदार अमित देशमुख यांनी केली. भारतात दरवर्षी साखरेचा खप २२५ लाख टन असला तरी त्यातली ७0 ते ८0 टक्के साखर आइसक्रीम, चॉकलेट्स, मिठाई, कोल्ड्रिंक्स कारखान्यांमध्ये वापरली जाते. ग्राहकांच्या थेट वापराचे साखरेचे प्रमाण २0 ते ३0 टक्के आहे. ही तफावत लक्षात घेता सरकारने कारखान्यांना त्याचा भार उचलावयास भाग पाडले पाहिजे, अशी मागणीही आ. देशमुख यांनी केली. राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने साखरेसाठी स्टॉक लिमिट ठरवले होते. आता साखरेवरील स्टॉक लिमिट सरकारने काढून टाकले असल्याने साठेबाजीवर नियंत्रण कसे घालणार, हा मोठा प्रश्न आहे.
साखरेचा भाव गाठणार पन्नाशी
By admin | Published: April 20, 2016 6:01 AM